गादीचा अहंकार, गमावलेले शिलेदार आणि एका माणसाचा एकहाती खेळ... पण उद्या काय?

गेल्या दहा-बारा वर्षांत या माणसाने भारतीय राजकारणाचा सगळा पटच असा काही फिरवलाय की भल्याभल्यांची भंबेरी उडली. पण एक त्रयस्थ म्हणून या सगळ्याकडे पाहताना लक्षात येतं की, फक्त या माणसाची ताकद किंवा रणनीती एवढंच या यशाचं गमक नाही. याला तितकेच कारणीभूत आहेत ते समोरचे विरोधक, ज्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःची कबर खोदली. कारण? घराणेशाहीची मस्ती आणि नवा नेता उभा करण्यात आलेलं अफाट अपयश.

'आमचीच गादी' आणि गमावलेले खंदे वीर


वर्षानुवर्षे काँग्रेस आणि काही प्रादेशिक पक्षांनी एकाच गोष्टीवर फोकस ठेवला- 'आमचं घराणं, आमचीच गादी'. आजचा तरुण मतदार बदललाय, त्याला भूतकाळातल्या नावांपेक्षा वर्तमानात छाती ठोकून उभा राहणारा नेता हवाय, हे यांच्या गावीही नव्हतं. गादी वाचवण्याच्या नादात त्यांनी या माणसाला टक्कर देऊ शकेल असा एकही नेता कधी घडूच दिला नाही.

या 'हायकमांड'च्या इगोची आणि दरबारी राजकारणाची किंमत त्यांना जबरदस्त मोजावी लागली. जे खऱ्या अर्थाने मातीतून आलेले, झुंजार नेते होते, त्यांना मुद्दाम खड्यासारखं बाजूला काढलं. शरद पवारांसारख्या जाणत्या नेत्याला याच घराण्याच्या अहंगंडातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला. डाव्यांच्या छाताडावर पाय देऊन बंगाल जिंकणारी ममता असो, किंवा आज ईशान्येत भाजपचा सर्वात मोठा तारणहार असलेला हिमंता बिस्वा सरमा असो... या सगळ्यांना पक्षश्रेष्ठींच्या अहंकारानंच दुरावलं. आंध्रमध्ये जनमानसाची नस पकडणाऱ्या जगन मोहन रेड्डीचंही त्यांनी तेच केलं.

एवढंच कशाला, पी. व्ही. नरसिंह राव आणि प्रणब मुखर्जींसारख्या प्रगल्भ दिग्गजांनाही केवळ 'घराण्याला धोका नको' म्हणून कायम सावलीतच ठेवलं. स्वतःचेच खंदे शिलेदार गमावल्यामुळे आज हे मुंडी कापलेल्या कोंबड्यांसारखे सैरावैरा पळतायत.


दुसरा कोण? आणि या माणसाची एन्ट्री...

मग होणार काय? जनतेला जेव्हा समोरच्या गोटात कुणी तगडा पैलवानच दिसला नाही, तेव्हा त्यांच्याकडे एकच पर्याय उरला - 'There Is No Alternative' (TINA). 'दुसरा पर्यायच नाही' या भावनेवर या माणसाने असं काही गारूड केलं की, जनतेने बाकी सगळं विसरून त्याच्याच पारड्यात भरभरून दान टाकलं. हा फक्त भाजपचा विजय नव्हता, तर 'बापाची जहागिरी' समजून सत्ता मागणारी जी व्यवस्था होती, तिला जनतेने दिलेली ती सणसणीत चपराक होती.


विकासाचा सुसाट गाडा आणि केंद्रीकरणाचा धोका

हे मान्य करावंच लागेल की, या सत्तेच्या जोरावर या माणसाने देशाच्या विकासाचा गाडा सुसाट हाकलाय. पायाभूत सुविधा, डिजिटल ताकद आणि जगात देशाचा वाढलेला रुतबा या गोष्टी कुणालाही नाकारता येणार नाहीत. भाजपा च्या राजकारणतही काही त्रुटी आहेत. पण राष्ट्र प्रगतीपथावर आहे आणि म्हणून च जनतेचा कौल सोबत आहे. 


पण इथंच एक मेख आहे. आज सगळी सूत्रं आणि सगळ्या नाड्या एकाच माणसाच्या हातात एकवटल्या आहेत. संस्थात्मक स्वायत्तता कमी होणं आणि असहमतीला जागा न ठेवणं, या गोष्टी निरोगी लोकशाहीला कधी ना कधी आतून पोखरतात, हे विसरून चालणार नाही.


नेतृत्वाचा तिढा: उद्या जेव्हा तो नसेल...

आणि इथूनच पुढची खरी गोम सुरू होते. ज्या घराणेशाहीने विरोधकांना संपवलं, त्याच वाटेवर आता भाजप एका वेगळ्या रूपात उभा आहे. तिथे घराण्याची गादी होती, इथे सगळा पक्ष इतका 'मोदीमय' झालाय की, या माणसाच्या तोडीचा, लोकांमध्ये जाऊन मिसळणारा दुसरा कुणी नेता आज पक्षात शोधूनही सापडत नाही.

कुठे थांबायचं हे त्याला माहीत आहे, पण उद्या जेव्हा सगळी सूत्रं दुसऱ्याच्या हाती देण्याची वेळ येईल, तेव्हा ती कुणाच्या हाती देणार? विरोधक घराण्याच्या मस्तीपायी बुडाले. आता भाजपने हे लक्षात ठेवायला हवं की सगळा भार एकाच खांद्यावर टाकला, तर उद्या तो खांदा नसेल तेव्हा या अथांग पसाऱ्याला आणि झुंडीला दिशा कोण देणार? सगळ्या नाड्या आज त्याच्या हातात आहेत हे खरं, पण उद्याच्या नेतृत्वाचं काय? हा प्रश्न आज ना उद्या समोर उभा राहणारच आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एक गारूड: आकलनापलीकडचे

Hunting Threats Across Entra ID and Purview with PowerShell